मराठी बालकवींच्या कविता - श्रावणमासी हर्ष मानसी
श्रावणमासी हर्ष मानसी श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे; क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ! वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे ! झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा, तो उघडे तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ! उठता वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा; सर्व नभावर होय रेखिल सुंदरतेचे रूप महा ! बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते, उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ! फडफड करून भिजले अपुले पंख पाखरे सावरिती; सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ! खिल्लारे ही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे, मंजुळ पावा गात तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ! सुवर्णचम्पक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा, रोष मनीचा मावळला ! सुंदर परडी घेऊनि हाती पुरपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले-पत्री खुडती ! देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात, वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत !